स्वर
स्वरांची रचना शहरात किंवा गावात एखाद्या गर्दीच्या ठिकाणी जर तुम्ही उभे असाल तर विविध वाहनांचे आवाज , माणसांची बडबड , फेरीवाल्यांचे ओरडणे , दुकानांमधील असंख्य आवाज या सार्यांनी बनलेला गोंगाट आपल्याला ऐकू येतो . गोंगाटाचा विशेष गुणधर्म म्हणजे आवाजांमध्ये असलेली अनियमितता आणि असबंधपणा होय. समुद्राच्या काठी भरतीच्या वेळेस शांत ठिकाणी तुम्ही उभे असाल तर किनार्यावर येऊन धडकणार्या लाटांचा आवाज तुमच्या कानावर येतो. या समुद्राच्या गाजेमध्ये एक नियमितता आलेली दिसते. आवाजामधला नियमितपणा हा ध्वनी ते स्वर या प्रवासातला पहिला महत्वाचा घटक आहे. आपल्या गावापासुन दूर एखाद्या जंगलात तुम्ही फेरफटका मारत असाल तर पक्ष्यांची किलबिल ,भुंग्याचा गुंजारव तुम्हाला ऐकू येईल . या आवाजामध्ये नियमिततेबरोबरच सुखदपणा किंवा कानाला गोड वाटण्याची क्षमता दिसते . हा सुखदपणा ध्वनीला स्वराकडे नेणारा दूसरा महत्वाचा घटक आहे. भुंग्याच्या आवाजाची एक विशेषता म्हणजे तो आवाज एकाच पातळीचा,एकसारखा आहे असे आपल्याला जाणवते , म्हणजेच त्या आवाजाची कंपनसंख्या ही साधारणपणे एकाच असते . देवाच्या दर्शनाला देवळात गेल्या...