
आपल्या भारतीय संगीतात पूर्वी संगीत शिक्षण गुरुकुल पद्धतीने होत असे. एखाद्या श्रेष्ठ गायकाकडे संगीत शिकण्यासाठी राहणारी व्यक्ती त्या गायकाची मनोभावे सेवा करून,त्याच्या सानिध्यात चोवीस तास राहून संगीतकला अवगत करून घेत असे. पूर्वीच्या काही श्रेष्ठ व प्रतिभासंपन्न गायकांनी आपल्या वैशिष्ट्यपूर्ण गायकीने आपल्या स्वतच्या गायकीची एक विशिष्ट शैली निर्माण केली व पुढे आपल्या शिष्याकरवी ती तशीच्या तशी जतन करण्याचा प्रयत्न केला. त्यातून त्यांना संगीतशैलीची एक विशिष्ट कुटुंबेच संगीतक्षेत्रात वावरू लागली. त्यातून संगीतातील घराण्यांचा जन्म झाला. थोडक्यात असे म्हणता येईल की संगीतातील ही घराणी म्हणजे विविध संगीतशैलीची परंपरा जतन करणारी कुटुंबेच होय.
ग्वालेर घराणे : प्रख्यात संगीतकार खॉ नथन पीरबक्ष हे या घराण्याचे संस्थापक. त्यांचे नातू प्रख्यात ख्यालगायक हस्मु खॉ व हददू खॉ हे ग्वालेर दरबारचे गायक होते. महाराष्ट्रात ख्याल गायकी आणणारे कै. बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर हे याच घराण्याचे. संगीताचा सर्व भारतभर प्रभावी प्रचार करणारे व विद्यालयीन पद्धतीच्या संगीतशिक्षणाचा पाया घालणारे कै.विष्णु दिगंबर पलूस्कर व त्यांचे शिष्य पं.ओंकारनाथ ठाकुर, कै. विनायकराव पटवर्धन, कै. नारायणराव व्यास ही सर महाराष्ट्रीय कलाकार मंडळी ग्वालेर घराण्याची देणगी आहे. त्याचप्रमाणे कुमार गंधर्व , कै.प्रो.बी.आर. देवधर, तरुण गायकात सौ. वीणा सहस्रबुध्ये, अतुल व्यास, शरद साठे इत्यादी गायक ग्वालेर घराण्याची परंपरा चालवीत आहेत. पं.शरदचंद्र आरोलकर हे या घराण्याचे आदरणीय असे ज्ञानवृद्ध गायक आहेत .
गायकीचे वैशिष्ट्य : जोरदार व खुल्या आवाजातील गायन हे या गायकीचे वैशिष्ट्य. ख्यालगायन थोडेसे ध्रुपद अंगाने गाण्याची पद्धत आहे. ग्वालेर घराण्याची प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे अनेकढंगी, भारदस्त व रसभरीत असे अस्ताई – अंतरे . त्याच अंगाने होणारा रागाचा विस्तार . रागाचा प्रारंभ आणि शेवट यांच्याकडे विशेष लक्ष. तिलवाडा , झुमरा हे या घराण्याचे आवडते ताल आहेत. बेहलावेयुक्त आलाप, बोलतान, आरोह, अवरोही, संचारी अशा ताना हे या घराण्याचे आणखी एक वैशिष्ट्य. सरल सपाट तान आणि रागांची शुद्धता याकडे या घराण्याचे विश्र्श लक्ष असते.
किराणा घराणे: खांसाहेब अब्दुल करीम खां यांना त्यांचे वडील कालेखां, चुलते अब्दुल्लखां आणि चुलत चुलते हैदरबक्ष यांच्याकडून शिक्षण मिळाले. खांसाहेब अब्दुल करीमखां यांचे शिष्य म्हणजे रामभाऊ कुंडगोळकर उर्फ सवाई गंधर्व. सुरेश बाबू माने, रोशन आरा बेगम, गानहिरा हिराबाई बडोदेकर आणि सरस्वती राणे या किराणा घराण्याच्याच गायिका. पं. भीमसेन जोशी व गंगूबाई हनगल हे सवाई यांचे शिष्य. प्रभा अत्रे पण याच घराण्याच्या प्रसिद्ध गायिका.
गायकीचे वैशिष्ट्य: या घराण्याचे वैशिष्ट्य म्हणजे सुरेलपणा. या घराण्याचे तंबोरे इतके सुरेल लावलेले असतात की नुसते तंबोरे वाजू लागले की मैफलीत रंग भरायला सुरवात होते. अत्यंत भावपूर्ण गायन हे या घराण्याचे आणखी एक वैशिष्ट्य. तोडी, जोगिया, मालकंस, शुद्ध कल्याण, हे या घराण्याचे आवडते राग. हळुवारपणा, नाजुकपणा हा या घराण्याचा विशेष आहे.
जयपूर घराणे : या घराण्याला अत्रौली घराणे असेही म्हणतात. संगीतातले गानमहर्षी उ. अल्लादीयाखां यांनी या घराण्याच्या गायकीचा प्रसार केला. पटियाळा घराणे हे याच घराण्यातील एक प्रवाह. महाराष्ट्रात या घराण्याचा प्रसार तो मुख्यत्वेकरून सुरश्री केसरबाई केरकर, गानतपस्विनी मोंघुबाई कुर्डीकर, पं. मल्लिकार्जुन मंसुर इत्यादीमुळे . सौ. किशोरी आमोणकर यांनी या घराण्याची पुढे वाटचाल सुरू ठेवली.
गायकीचे वैशिष्ट्य : संपूर्ण मालकंस, बसंती केदार, रामसा कानडा, कबीर भैरव, खोकर असे अप्रसिद्ध राग घराण्याचे खास राग आहेत. विलंबित तीनतालात बहुतेक चिजा गाण्याचा प्रघात आहे. अत्यंत लयबद्ध गायन हे या घराण्याचे वैशिष्ट्य आहे. या घराण्याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे वक्र आणि लांबलचक ताना. भरपूर दमसास हे या घराण्याचे खास वैशिष्ट्य. भावगीत, ठुमरी, भजन, गझल, दादरा हे प्रकार प्रामुख्याने गायले जातात. आकारयुक्त खुला आवाज, पेचदार वक्र ताना, भरपूर दमसास, अप्रसिद्ध राग आणि समेवर येण्याची खास शैली या घराण्याची प्रमुख वैशिष्ट्य.
आग्रा घराणे : संगीतसम्राट तानसेन यांचे जावई हाजी सुजान हे आग्रा घराण्याचे प्रवर्तक मानले जातात. गग्गे खुदाबक्ष यांनी ग्वालेर घराण्याचे भरपूर शिक्षण घेतले. बडोद्याचे रंगीले गायक उस्ताद फैयाजखां यांच्यामुळे हे घराण्याचा प्रसार झाला. उस्ताद विलायत हुसैनखां, दिनकर कायकिणी, सौ. ललीत राव, बबनराव हळदणकर याच घराण्यातील प्रसिद्ध गायक होत.
गायकीचे वैशिष्ट्य : या घराण्यात खुला व जोरकस आवाज लावण्याची पद्धत आहे. आग्रा घराण्याचे गायन अत्यंत आक्रमक आहे. जबड्याच्या ताना, आकरमक बोल ताना, तालाशी झटापट अशी काही घराण्याची वैशिष्ठ्ये आकर्षक आणि आक्रमक आहेत. आलाप करताना नोम् तोम् करणे हे या घराण्याचे आणखीन एक वैशिष्ट्य. ध्रुपद, धमार, होरी हे प्रकार या घराण्याचे गायक आकर्षकपणे गातात. आक्रमक आणि जोरकस तान घेऊन अचूकपणे समेवर येणे हे या घराण्याचे खास अंग आहे.
पवार गोकुळ एकनाथ
के.टी.एच.एम.महाविद्यालय
पत्रकारिता व जनसंज्ञापन विभाग
व जनसंज्ञापन विभाग
Comments
Post a Comment