कॉलेजचे दिवस भाग - १

                                    डेजची धम्माल अन बरच काही 


 2014 ला मी BA च्या शेवटच्या वर्षाला होतो. SY ला पहिला आल्यानंतर माझी वर्णी महाविद्यालयात GS म्हणून लागली. त्यानंतर वेगवेगळ्या उपक्रमात मी व माझे सहकारी सहभागी असायचे. असच एकदा कॉलेज डेजच्या निमित्ताने प्लान करायच ठरवलं. सर्व नियोजन व्यवस्थित पार पडलं. पण शेवटचा कॉलेज डे धडाक्यात साजरा करायचा. अशाप्रकारे चार पाच मित्र जमलो ... उद्याचं नियोजन सुरू होत..... राहुल, उद्या काय करायचं यार... असं मित्राला विचारलं  काहीच सुचत नव्हतं ...  गेल्या  पाच-सहा दिवसापासून महाविद्यालयात होत असलेल्या वेगवेगळ्या डेजनी मुलांचा उत्साह एकदम ओसंडून वाहत होता. मग आमचा विचार झाल्यावर मी सरांना जाऊन भेटलो. 

या सर्व गोष्टींसाठी त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केले होते.  त्यांनी सांगितले यापूर्वी  शेवटच्या दिवशी Dj असायचा परंतु यावर्षी मॅडमने सक्त ताकीद दिली आहे कि कोणत्याही परिस्थितीत DJ वाजवायचा नाही.  अन् तसही आम्ही खेड्यातली मुल होतो. त्यावेळी DJ ला देण्यासारखा आमच्याकडे पैसाही नव्हता. त्यावेळी आम्ही सरांसमोर एक विचार मांडला. लागलीच सरांनी होकार दिला. मी लगेचच मोबाईल वर नंबर डायल केला, माझे नातेवाईक जे गंगापूरला राहत होते त्यांना ही हकिकत सांगितली. त्यांनीही आडकाठी न घेता येण्यास होकार दिला. खरी समस्या तर पुढे होती, उद्या तर DJ नाहीय... मग मुल आनंद साजरा करणार कशी... माझ्या मनात सारखी धाकधुक होती... उद्या नियोजित केलेला कार्यक्रम यशस्वी होण आवश्यक होता. दुसरा दिवस उजाडला... आमची लगबग चालु होती.

ट्रडिशनल डे असल्याने सर्व विद्यार्थी पारंपारिक पेहरावात आले होते. शिक्षक वर्गही मोठ्या उत्साहात होता.. सर्व जण विचारत होते.. अरे काय नियोजन आहे, कुठंय तयारी ... हे चालु असताना एक चार ते पाच लोक कॉलेज मध्ये आले. ते सगळे आपल्या सगळ्या ताफ्यासह उपस्थित होते... मला  प्रत्येक जण त्यावेळी विचारत होता.. अरे कोण आहेत ही मंडळी.. कॉलेज मध्ये काय करताय... मी म्हणायचो थांबा लवकरच लक्षात येईल. अन मग त्यांनी सुरवात केली . दोघांच्या  हातात सनई, अन  एका हातात संबळ ... अन मग काय सर्व गर्दी याकडे लक्ष देऊन होती. सुरवातीला अचंबित होणाऱ्या विद्यार्थ्यांनी नंतर बेभान होऊन त्या वाद्यांवर नाचायला सुरवात केली. शिक्षक वर्गही खुश झाला होता.

 आमच्यातल्या एकाने तो संबळ हातात घेतला आणि वाजवू लागला त्यामुळे आणखीनच जोश येत आम्ही नाचत होतो. त्या वातावरणात असं वाटलं देखील नाही कि, एका पारंपरिक वाद्यांवर नाचत आहोत. साधारण तास दोन तास आम्ही मनसोक्त आनंद घेतला. त्यानंतें सरानी सांगितल्याप्रमाणे आम्ही सर्व सेमिनार हॉल मध्ये गेलो. सर्व विद्यार्थी , शिक्षकवर्ग तसेच आम्हाला आनंद देणारे सनईवादक.. एवढे थकले असताना देखील सर्व विद्यार्थी उपस्थित होते. सरानी सर्वांची  ओळख करून दिली. त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यातील एकाने बहारदार आवाजात एक गीत सादर  केले.

शेवटच्या क्षणी सरांनी मला व्यासपीठावर बोलवून घेतले. आणि नियोजन कसे असावं याबद्दल माझं कौतुक केलं. आणि  करण्यासाठी त्या ताफ्यातील एका व्यक्तीला बोलावलं ..... तो सत्कार होत असताना अक्षरशः माझे डोळे भरून आले  होते. कारण माझा सत्कार करणारे दुसरे तिसरे कोणी नसून माझे वडील होते.... तो क्षण माझ्यासाठी सोहळा होता ... क्रमश : 

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

भारतीय संगीत

भारतीय शास्त्रीय संगीत

संगीत वाद्य